स्त्री भ्रूण हत्या

अरे माणसा नको करू स्त्री भ्रूण हत्या
नाही मिळायची तूला ताई, मावशी आणि आत्त्या
मुलगी म्हणजे पणतीमधील तेवणारी वात
नको करू मारून तिचा जन्माआधीच घात
चिमुकल्या पावलांनी येऊ दे रे, सावली तिची घरात
आजीलाही पाहू दे रे, अंगणात खेळणारी तिची नात
तोडू नको रे फुटण्याआधी, "मुलीच्या" नावाची पालवी
मोठे होऊन तिच उद्या, संसार दुसऱ्याचा चालवी
खरंच किती असतं रे, मन तिचं भोळं
घेऊदे रे तिलाही अंगावर, सूर्याचं ऊन कोवळं
पडू दे रे तिच्याही देहावर, आईच्या मायेची सावली
बनून भावाची सावली, आजवर तीनेच बहिणीची माया दावली
मुलगी असते अंधारातील चमकणारा काजवा
मग "मुलगी नको मुलगा पाहिजे " असा हट्ट कशाला हवा?
मुलगी असते प्रकाश देणारा एक दिवा
प्रसादाला वाटणाऱ्या त्या शिऱ्यामधील रवा
जाणू दे रे तिलाही जरा, त्या शिऱ्यामधील गोडवा
करू दे रे तिलाही साजरा , तो चैत्रामधील पाडवा
मुलगा हवा म्हणून करतोस ना तिच्या जीवाचा खात्मा
मग जरा ऐक... काय म्हणतोय तिचा आत्मा...
बाबा.... मी तुमची लेक बोलतेय...
आईच्या पोटातून बाहेर पडण्याची वाट बघतेय...
येऊ दया ना मला, आईच्या उदरातून बाहेर...
मला ही बघायचं आहे ओ, माझ्या आईचं माहेर...
वाढवलंय ओ मला आईने, करून पोटाचे जाळे
अजून किती सोसू मी, तीच्या पोटात येणारे गोळे
रोजच अंधार पाहतेय, नसेल ना ओ मी अंध ?
उद्या बाहेर आल्यावर, घेऊ शकेल का ओ मी फुलाचा गंध?
इथेच सारखी राहून, होणार नाही ना मी मती मंद?
जन्मास येऊन मलाही, जपायचे आहेत की ओ छंद
दादासारखी मी ही उद्या, होईन तुमची नंद
राखी बांधून चेहऱ्यावर त्याच्या , फुलविन मीच आनंद
देईन मी सुगंध तुम्हाला, बनून फुलाची पाकळी
घेऊद्या मलाही श्वास, तोडून तुमच्या बंधनांची साखळी
जिने सोसल्या माझ्यासाठी कळा, तिला मला पाहायचं आहे
मातृत्वाचे मोल थोडं मलाही तिच्याकडून जाणायाचं आहे
दादासारखं मलाही तुम्हाला "बाबा" म्हणून हाक मारायची आहे
भाऊबीजेच्या सणाला मलाच ओवाळणी करायची आहे
आई सांग ना गं तू बाबांना, नको ना अशी मुकी राहू
ईवल्याश्या जागेत राहून,आता अवघडलेत गं माझे बाहू
सांग ना त्यांनाही समजावून, वाढवायला माझा गर्भ
मी ही त्यांचीच लेक आहे, यात कशाला हवाय संदर्भ
का ग येते बाबांना, त्यांच्याच लेकीची कीव
पोटातच मला नष्ट करताना, किती गुदमरतोय माझा जीव
आई... बाबा.... आणि..... दादा......
आता एकच विनंती तुम्हा सगळ्यांना
खुलू द्या माझ्या चेहऱ्यावर हास्य, बनून कुटुंबाची सदस्य
करू नका माझ्या देहाचा अग्नी
नाही करनार मी तुमच्याकडे कोणतीच मागणी
खूप भीती वाटतीये, पाहून आईच्या पोटातील काळोख
सूर्याला पाहून होऊ द्या, मलाही प्रकाशाची ओळख
खरंच सांगते नका करू माझा जन्माआधीच विनाश
आता फक्त घेऊ द्या मला "मोकळा श्वास"
आता फक्त घेऊ द्या मला "मोकळा श्वास"
सुंदर कविता
ReplyDeleteधन्यवाद...🙏🙏
ReplyDelete