माझ्या कविता

Thursday, December 27, 2018

आदर

  

"आदर" होता मावळ्यांना शिवरायांचा 
"आदर" होता पवनपुत्राला श्रीरामाचा 
तसाच असावा "आदर" आपल्याला 
आपल्या जन्मदात्या माता पित्यांचा 

असा कसा कलियुगाचा फेरा आला 
"आदरा"वरच सगळ्यांनी घातला घाला 
करूनी नात्या गोत्याचा दही काला 
त्यांच्याविषयीचा "आदरच" गिळून टाकला 

मानुनी ज्यांनी परस्त्री माते समान 
मिळवून दिले त्यांना त्यांचे ईमान 
ज्यांनी  दिला आपल्याला मिळवून मान सन्मान 
तेच आपल्या स्वराज्याचे तीर कमान 
म्हणूनच गुणगान गातो शिवरायांचे संपूर्ण हिंदुस्थान 
घेता नाव ज्यांचे आपल्या मुखाने 
मन प्रसन्न होते त्यांच्याविषयीच्या "आदराने" 
म्हणून सांगतो "आदर" म्हणजे आपले "शिवराय"
जिथे पाहावा "आदर", तिथे ते नाही आठवले तर त्यात  नवल काय? 

अरे माणसा जर असता तुझ्या मनी स्त्रीविषयी "आदर" 
तर कोपर्डीच्या ताईवर गेली नसती तुझी वाकडी नजर 
जर घेतली असतीस बहिणीने लावलेली माया मनावर 
तर पडली नसती त्या ताईची किंचाळी आमच्या कानावर 
जरी झाला असता तुला  आईच्या मायेचा साक्षात्कार 
तर कधीच केला नसतास तू  तिच्यावर अमानुष अत्याचार 
असा कसा माणसा सोडलास "आदर" 
क्षणिक सुखासाठी केलास कोवळ्या जीवाचा अनादर
असा कसा रे निष्ठुर होऊन काळिमा फासलास माणुसकीच्या नावाला  
केला नसतास अत्याचार तर वेदना झाल्या नसत्या तिच्या कोवळ्या जीवाला 
अरे बनला असतास जर तिचा रखवाला 
तर आई बाबांना इथेच सोडून,  गेली नसती ती देवाच्या गावाला 
खेळली असती, बागडली असती 
रक्षाबंधनाला "भाऊ" म्हणून तिने तुलाच साद घातली असती 
तिची ती माया पाहून अभिमानाने छाती तुझीच फुलली असती
खरंच तुमच्या नात्याचे कौतुक करताना जीभ आमचीही गहिवरली असती 
जर आज ती आमच्या सोबत हजर असती
खरंच... जर आज ती आमच्या सोबत हजर असती
म्हणून सांगतो, 
द्यावा आदर, घ्यावा आदर 
पाहावा आदर, दाखवावा आदर 
जाणावे या शब्दाचे मोल 
कारण "आदर" या शब्दाचा अर्थ लय खोल  
करशील जर पुन्हा असा झोल 
तर सगळे आयुष्य ठरेलं तुझं कवडीमोल 
अरे पाण्यानेही पेटतील वाती, टिकून राहतील आपलीच नाती 
तेंव्हा पुन्हा एकदा पहाटेच्या जात्यावरती, माता तुझाच गोडवा गातील 
माता तुझाच गोडवा गातील... 

No comments:

Post a Comment