येताना काहीही घेऊन आलो नाही
जाताना काहीही घेऊन जाणार नाही
आज खात असलो जरी पिझ्झा, बर्गर
शेवटी मात्र नैवेद्याशिवाय पर्याय नाही...म्हणून...
आयुष्य थोडं असंही जगावं
भुकेलेल्या पोटाला थोडं अन्नाचं दान द्यावं
त्याला समाधानाचा ढेकर देताना पाहून
आपणही डोळे भरुन पाहण्याचं पुण्य मिळवावं...
अरे माणसा कोणाचे हे घर दार
ठेऊन इथं सारं, शेवटी मोकळा की रे जाणारं,
ज्याने दिले हे वैभव सर्व
त्याने कधीच दाखवला नाही गर्व
ज्याने केली तुझी उत्पत्ती, त्यानेच दिली तुला संपत्ती
मग कशाला बाळगशी संपत्तीचा मोह
कितीही केलंस तरी, नश्वर तुझा देह..म्हणून..
आयुष्य थोडं असंही जगावं
मिळवलेल्या संपत्तीतलं थोडं दान करावं
समजून फुल ना फुलाची पाकळी
भरावी आपणही थोडी त्या गरीबाची झोळी
अरे माणसा किती म्हणशील माझं माझं
शेवटी तुझंच की रे चार चौघांना ओझं
किती बांधशील बंगला माडी
शेवटी नाही मिळणार मोटार गाडी
इथेच ठेऊन बंगला माडी आणि मोटार गाडी
घेऊन जाईल ती अलगद
चार खांद्यावरुनी मेसाची दांडी...म्हणून...
आयुष्य थोडं असंही जगावं
घरी आलेल्या प्रत्येकाला थोडं चहा पाणी पुसावं
आपुलकीचा स्नेह जोडून नात्याचं मोल जाणावं
आयुष्य थोडं असंही जगावं...
कधी लहान तर कधी मोठं होऊन बघावं
नाही जाणलं सुख तरी, दुःख मात्र जाणावं
पाहताच एखाद्याला निराधार, आधार त्याचा बनावं
गरीबाच्या मदतीला हक्काने चार पावलं धावून जावं
थकून आलेल्या आई बाबांना, दोन घास आपणही भरवावं
ज्यांनी दिला जन्म आपल्याला त्यांच्या चरणी लीन व्हावं
कितीही मोठे झालो तरी मातापित्यांच्या ऋणांत राहावं...
आयुष्य थोडं असंही जगावं
जिवंतपणी पराकोटीचं सुख मिळावं
शेवटी निघून जाताना मात्र..
शरीराचं चंदन व्हावं...
खरंच आयुष्य असचं जगावं....

No comments:
Post a Comment