प्रश्न पडतो मनाला आणि उत्तर शोधतो मी
पहा कसे हे दिवस आले, बदलून गेले सगळे
इकडे पाहू की तिकडे, माणुसकी भेटेल का तुमच्याकडे?
कुत्र्याला दाराशेजारी बांधून, आजवर सांभाळलीस दाराची कडी
त्याच कुत्र्याला दारात आल्यावर, पळवून लावते का तुझी छडी ?
दिवसभर उपाशी राहून ज्याने केली तुझी चाकरी
आज दारात आल्यावर त्याला, मिळते का रे तुझ्याकडून भाकरी ?
असा कसा माणसा निष्ठुर झालास तू
घर सांभाळणाऱ्या "मोतीला" का विसरलास तू
रक्षणकर्त्या मोतीमध्ये इमानदारी शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणुसकी शोधतो मी
घरामध्ये कोंबडा पाळून ऐकलीस त्याची बांग
तेंव्हाच झालास जागा आणि लावलीस कामाची रांग
कधी भासली का रे उणीव घड्याळाच्या गजरची?
थोडं विचार करून सांग
त्यालाच कापून खाताना, खरच होतं का रे तुला भान?
आता सांग माणसा कसे फेडशील तू त्याचे पांग?
जाणून घे त्याचे काम आणि "मी" पणा जरा खुंटीला टांग
कोंबड्याच्या बांगेमधून "वक्तशीरपणा" शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणुसकी शोधतो मी
घेतलास जन्म जिच्या उदरी, तिनेच जपलं तुला आपल्या पदरी
कधी लांबून आणल्या तुझ्याचसाठी डोक्यावरून पाण्याच्या घागरी
तर कधी तुझ्याचसाठी केली लोकांची चाकरी
घेतली नाही कधी आजारपणी डॉक्टरांकडून गोळी
प्रत्येक वेळी केली आपल्या सुखाची होळी
तुझ्याच सुखासाठी धरली हातात झोळी
तर कधी विकली लांबून तोडून आणलेल्या लाकडांची मोळी
जिने धरली तुझ्यावर मातृत्वाची छाया
तिनेच झिजवली तुझ्यासाठी काया
डोळे भरून येतात पाहून जिची माया
ऊभा जन्म वाहिला तरी जाईल सगळी भक्ती वाया
कधी केलास का रे विचार तू, तिने केलेल्या त्यागाचा
तूला पोटभर खायला घालून, भुकेची होळी करणाऱ्या तिच्या पोटाचा ?
आठवते का रे तूला, जेव्हा पडली होती थंडी बोचरी
नवी साडी फाडून तिने बनवली होती तुझ्याचसाठी गोधडी
असा कसा माणसा कर्तव्यहिन झालास तू
जिचा सांभाळ करायचा तिलाच घराबाहेर काढलेस तू
तिचे अनंत उपकार विसरून तिच्याच जिवावर ऊठलास तू
इतक्या खालच्या थराला जाऊन, कोणते सुख भोगलेस तू?
जिने आयुष्यभर जपला तुझा थाट
तिलाच दाखवलीस "आश्रमाची" वाट
तिच्याच आशीर्वादाने आजवर चढलास सुखाचा घाट
जरी वाहिलेस अश्रूचे पाट
तरी रोखू शकणार नाहीस संकटाची लाट
लक्षात ठेव माणसा, आता जरी आली तूला तिची कीव
तरी नेहमीच जाणवेल तूला तिची उणीव
जन्मदात्या आईमध्ये "मायेचा ओलावा " शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणुसकी शोधतो मी
यात्रेमधून फिरताना मागितलीस गाडी
केली नाही दाढी, पण घेऊन दिली तूला गाडी
लहानपणी "बाबा" म्हणताना वाटायची तूला भलतीच गोडी
मोठेपणी त्यांना सांभाळताना का रे पडतात तूला नको ती कोडी?
सोडून दे ती कोडी आणि चढ पुन्हा यशाची माडी
तेंव्हाच कळेल तुला, करून ज्यांनी पोटाची काडी
कशी धरली होती त्यांनी पितृत्वाची नाडी
प्रत्येक यशावेळी ज्यांनी मारली तुझ्या पाठीवर थाप
तेच कसे वाटू लागतात रे तुझ्या डोक्याला ताप?
तुझ्याचसाठी शेतात राब राब राबताना लागायची त्यांना धाप
आज उतरत्या वयात त्यांनाच राबवताना
वाटत नाही का रे तूला पाप?
जाणून घे त्यांची धाप आणि निष्ठुरपणाचे मूळ जरा काप
तुझ्याच नोकरीच्या पैशासाठी ज्यांनी झिजवल्या चपला
तू मात्र निष्ठुर होऊन गळा त्यांचा कापला
काय केलं होतं रे पाप त्यांनी म्हणून तू आज असा त्यांच्यावर कोपला?
संपत्तीच्या हव्यासापोटी धारेवर धरलेस बापाला
कागदावर सह्या घेऊन अनाथ केलेस जन्मदात्या पित्याला
काय वाटलं असेल रे त्यांच्या मनाला , थोडं विचार करून बघ
तुलाही बाप व्हायचं आहे, थोडं आठवून तरी बघ
पितृत्व म्हणजे काय असतं समजेल तूला मग
उपकार त्यांचे जाणायला खूप वेळ झालेला असेल
"बाबा" म्हणून साद घालताना, घसा मात्र तुझा कोरडा असेल
पोराच्या सुखासाठी काया झिजवणाऱ्या बापामध्ये "पितृत्वाचा झरा" शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणुसकी शोधतो मी

Ekach number Santosh bhavu
ReplyDeleteKhatarnak.....🙏
ReplyDelete